कंत्राटावरून झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा प्रयत्न   

पुणे : साफसफाईच्या कंत्राटावरून झालेल्या वादातून कंपनीच्या आवारात शिरून एकाने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी गज घालून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कर्वे रस्त्यावरील रेस्कॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतील मीटर रुममध्ये नुकताच हा प्रकार घडला. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी साफसफाईच्या कंत्राटदाराला अटक केली. दरम्यान, या घटनेत सुरक्षारक्षक हा कोमात गेला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अथर्व गणेश चव्हाण (वय २२, गणेशनगर, एरंडवणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये, अशोक तुकाराम पोटे (गणेशनगर, एरंडवणे) हे सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी, सचिन नामदेव सातपुते (वय ३०, केळेवाडी, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारदार सचिन सातपुते हे रेस्कॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला आहेत. कंपनीतील काम संपल्यावर ते शेजारील टीव्हीडीसी डान्स स्टुडिओमध्ये अर्धवेळ व्यवस्थापक म्हणून काम करत असून रात्री तेथेच झोपतात. 
 
रेस्कॉन कंपनीत सुरेंद्र कुमार यादव (शास्त्रीनगर, कोथरुड) व अशोक तुकाराम पोटे (गणेशनगर, एरंडवणे) हे रात्रपाळीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दरम्यान, गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सुरेंद्र कुमार यांनी सचिन सातपुते यांना उठवून अशोक पोटे यांच्यावर कोणीतरी हल्ला केला असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. त्यांनी मीटर रुममध्ये जाऊन पाहिले तर अशोक पोटे हे जमिनीवर पडले होते. 
 
त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यांनी पोटे यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मारहाणीमुळे पोटे हे कोमामध्ये गेले आहेत.घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे अथर्व चव्हाण याला अटक केली. अथर्व चव्हाण हा साफसफाईचे कंत्राट घेतो. या कंत्राटावरुन पोटे आणि चव्हाण यांच्यात वाद झाले होते. या रागातून चव्हाण याने पहाटे येऊन पोटे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Related Articles